शालेय विद्यार्थी शार्दुल येळेकर च्या पुस्तकाचे थाटात विमोचन!

39

शालेय विद्यार्थी शार्दुल येळेकर च्या पुस्तकाचे थाटात विमोचन!

# शार्दुल भविष्याचा लेखक!- मुख्याधिकारी डॉ.विजय देशमुख

वाडी (प्र.) : वाडी-दाभा परिसरातील निवासी व नागपुरातील सरस्वती विद्यालयात वर्ग नववीत अध्यापन करणाऱ्या शार्दुल शेखराम येळेकर या विद्यार्थ्यांने आपल्या एनसीसी कॅम्प दरम्यानचा अनुभव एका पुस्तक रूपात प्रकाशित केला. नुकतेच या पुस्तकाचे प्रकाशन व त्याच्या कार्याचे कौतुक वाडी न.प.चे मुख्याधिकारी डॉ.विजय देशमुख यांच्या हस्ते वाडी पत्रकार संघा तर्फे आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.

शार्दुल येळेकर च्या शाळेचे एन.सी.सी.चे १२ दिवशीय शिबिर सावनेर येथे नुकतेच संपन्न झाले.घरी परतल्यावर या बाराही दिवसाचा वृत्तांत व अनुभव त्याने विस्तृत स्वरूपात लिहून काढला.नंतर त्याचे वडील प्रा.डॉ. शेखराम येळेकर व आई डॉ. जयश्री येडेकर यांच्या प्रेरणेने त्याचे पुस्तकात रूपांतर केले. या निमित्ताने त्याचे कौतुक व सत्कार वाडी पत्रकार संघा तर्फे आयोजित करण्यात आला होता. प्रारंभी वाडी न.प.चे मुख्याधिकारी डॉ. विजय देशमुख यांचा वाडी पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन तलमले व प्रवीण सिंह यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.अतिथी प्रियदर्शनी शिक्षण महाविद्यालया चे प्रा.सुभाष खाकसे यांनी प्रस्तावनेत या विद्यार्थ्यांनी केलेली कौतुकास्पद कामगिरी व त्याला प्रेरणा देण्यासाठी,त्याचे हे स्तुत्य कार्य समाजा पर्यंत पोहचवीने आपली जबाबदारी असल्याचे सांगितले.

या प्रसंगी उपस्थित शार्दुलचे वडील प्रा.डॉ. शेखराम येळेकर व आई प्रा.डॉ. जयश्री येळेकर,भाऊ भार्गव यांचे ही स्वागत व अभिनंदन करण्यात आले.

मुख्याधिकारी डॉ. विजय देशमुख यांच्या हस्ते शार्दुल ला रोपटे, भेटवस्तू, आणि पुष्पगुच्छ देऊन त्याचा स्नेहील सत्कार करण्यात आला तर शार्दुलने लिहिलेल्या “माझ्या एनसीसी कॅम्पचा अनुभव” या पुस्तकाचे विमोचनही डॉ. विजय देशमुख व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना शार्दुल म्हणाला की कॅम्प संपल्यानंतर मी माझ्या आई-वडिलांची चर्चा करून माझ्या 12 दिवसाचा अनुभव लिहून काढला आणि माझ्या कुटुंबीयांच्या मदतीने याचे पुस्तकात रूपांतर करून प्रकाशन केले.त्यांनी याचे श्रेय शिक्षक,एनसीसी प्रशिक्षक, व कुटुंबियांना दिले. यामुळे मला निश्चितच एक नवीन अनुभव आणि भविष्याची वाटचाल करण्याची दिशा यातून मिळाली असल्याचे सांगितले. डॉ. विजय देशमुख यांनी देखील याप्रसंगी अवघ्या 9 व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला इतकी चांगली संकल्पना सुचणे व ते पुस्तक रुपात प्रकाशित करणे हे कौतुकास्पद व इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. निश्चितच शार्दुल मध्ये भविष्यातील लेखक समाजाला दिसत असून त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शार्दुलच्या आई-वडिलांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन विजय वानखडे तर आभार नरेशकुमार चव्हाण यांनी व्यक्त केले कार्यक्रमाला प्रामुख्याने दिलीप तराळेकर,आंचल लोखंडे,

ऋषीकुमार वाघ,प्रवीण तायडे,जितेंद्र पानतावणे इ.उपस्थित होते.