अखेर मृतक कर्मचारी सुभाष गजभिये च्या कुटुंबियाला ४ लाखाची मदत!

926

अखेर मृतक कर्मचारी सुभाष गजभिये च्या कुटुंबियाला ४ लाखाची मदत

# पदाधिकारी-कुटुंबियाच्या संघर्षाला यश!

वाडी (प्र) : डॉ.आंबेडकर नगर निवासी सामाजिक कार्यकर्ते सुभाष शंकरराव गजभिये हे नागपूर-अमरावती महामार्गावर उड्डाण पुल निर्मितीचे काम करणारी टी.एन.टी.इन्फ्रा कंपनीत ओरीयंटल असोसिएट च्या वतीने सुरक्षा रक्षकाच्या कर्तव्यावर तैनात असतांना १६ मार्चला रात्री लोखंडी बॅरियर डोक्यावर पडल्यामुळे त्यांचे मान व मेंदूला गंभीर दुखापत झाली होती. यामुळे त्यांना सदर स्थित विम्स रुग्णालयात आयसीयू मध्ये भरती करण्यात आले होते. शस्त्रक्रियेनंतर २५ मार्चला त्यांचे निधन झाले.या घटनेने मृतकाचे कुटुंब उघड्यावर पडून चांगलेच आर्थिक अडचणीत सापडले होते.

दरम्यान कंत्राटदाराने उपचार खर्च व उचित आर्थिक मदत देण्याचे मान्य केले खरे परंतु नंतर मात्र ते टोलवाटोलवी करीत असल्याने व भेटायला वेळ देत नसल्याने कंपनी संचालकांविरुद्ध कुटुंबासह नागरिकात तीव्र असंतोष निर्माण झाला होता.

त्यामुळे ३१ मार्च रोजी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव बंटी शेळके,माजी जि.प.सदस्य दिनेश बन्सोड,सामाजिक कार्यकर्ते समीर मेंढे सह मोठ्या संख्येने नागरीक एकत्रित येऊन कंपनी संचालका विरोधात आक्रोश मोर्चा काढला व वाडी पोलीस ठाणे गाठून संचालकांच्या वागणुकी विरोधात तीव्र आक्षेप नोंदवून पो.नि.प्रदीप रायन्नावार यांना योग्य कार्यवाहीची मागणी केली होती.वाडी पोलिसांनी कंपनी संचालकाशी संपर्क साधून आपसी समझोता करण्याचा सल्ला दिला अथवा नियमानुसार कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले.

समझोता बैठकीत कंपनी संचालकाने थातुरमातुर उत्तरे देऊन प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असता दिनेश बन्सोड यांनी मृतकाच्या परिवाराची बाजू उचलून धरीत आंदोलना सह कायदेशीर कार्यवाहिचा इशारा दिला.अखेर संचालकांनी नमते घेत बोलणी केली.व चर्चे अंती त्यांनी मृतकाच्या कुटुंबाला ४ लाख रुपये देण्याचे मान्य केले.तातडीने सर्व कागदोपत्री कारवाई पूर्ण करून ४ लाख रुपयाचा धनादेश पत्नी आशा गजभिये,मुलगा नितेश गजभिये, मुली वर्षा नारनवरे,सीमा सवाईथुल, चांदणी रायकर इं.ना ओरिएंटल असोसिएट कंपनीच्या संचालक प्रिया वासनिक,समाधान गोपनारायण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.मिळालेल्या आर्थिक मदतीने गजभिये कुटुंबियांनी काही प्रमाणात आधार मिळेल असे मत व्यक्त केले व कंपनी संचालका सह दिनेश बन्सोड यांचे आभार मानले.यावेळी दुय्यम पोलीस निरीक्षक गोडबोले, सामाजिक कार्यकर्ते समीर मेंढे उपस्थित होते.