वाडी नगरपरिषद येथे कामगार कपाती विरोधात आंदोलन
# कंत्राटी कामगाराना किमान वेतन द्या – स्वतंत्र मजदूर युनियन
# कामगार कपातीचा विषय कंत्राटदाराचा आहे. न.प.चा याचेशी संबंध नाही – मुख्याधिकारी
वाडी (प्र) : वाडी नगरपरिषद अंतर्गत अग्नीशमन विभागात कार्यरत असलेल्या तीन कंत्राटी कामगारांना कामावरून काढून टाकल्याच्या निषेधार्थ वाडी नगरपरिषद कार्यालयासमोर स्वतंत्र मजदूर युनियन, जिल्हा शाखा नागपूरच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष जे. एस. पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत व राष्ट्रीय उपाध्यक्ष नरेंद्र जारोंडे यांचे नेतृत्वात नारे-निदर्शने आंदोलन करण्यात आले.
वाडी नगरपरिषद अंतर्गत अग्निशमन विभागात काम करणाऱ्या प्रशिक्षीत कंत्राटी कामगारांनी महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार किमान वेतनाची मागणी केल्यावर संबंधित कंत्राटदाराने त्यांना कामावरून काढून टाकले. या विरुद्ध स्वतंत्र मजदूर युनियनने मुख्याधिकारी वाडी नगरपरिषद यांचेशी पत्रव्यवहार करून चर्चा केली आणि मुख्य नियोक्ता म्हणून ही कामगार कपात रद्द करून कामगारांना पुर्ववत कामावर घेण्याची मागणी केली. परंतु मुख्याधिकारी यांनी याबाबत कोणताही निर्णय न घेतल्याने युनियनने सहाय्यक कामगार आयुक्त यांचेकडे हे प्रकरण न्याय मिळण्यासाठी सादर केले. कामगार अधिकारी तथा समेट अधिकारी यांनी कामगार कपातीचा विवाद मिटविण्याचे निर्देश मुख्याधिकारी यांना दिले.यासह उपायुक्त, नगरपरिषद प्रशासन, विभागीय आयुक्त कार्यालय यांच्या निदर्शनास सदर बाब आणून दिल्यानंतर त्यांनीही तोडगा काढण्याचे निर्देश मुख्याधिकारी यांना दिले.
तरीही या कामगारांना कामावर पुर्ववत घेण्यासाठी मुख्याधिकारी यांनी कुठलीही कार्यवाही न केल्यामुळे १८ व १९ जून रोजी नगरपरिषद वाडी कार्यालयासमोर याविरोधात नारे- निदर्शने आंदोलन करण्यात आले.
यावेळी नरेंद्र जारोंडे यांनी अग्निशमन विभागातील कंत्राटी कामगार आनंद शेंडे, शुभम डांगाले व मनिष माहुलकर यांना पुर्ववत कामावर रुजू करून घेईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा प्रशासनास दिला. अग्निशमन विभागातील कर्मचारी भरती प्रक्रियेतील कंत्राटदार बदल्यामुळे साहजिकच कंत्राटदाराने जुने कर्मचारी काढून नवे कर्मचारी घेतले आहे.
आंदोलनाला बानाईचे पुर्व राष्ट्रीय अध्यक्ष कुलदीप रामटेके, स्वतंत्र मजदूर युनियनचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, राज्य सहसचिव गणेश उके यांनीही संबोधित केले.या धरणे-निदर्शने आंदोलनात अन्यायग्रस्त कामगारांसह दयानंद हाडके,बंटी बडगे,आदेश मेंढे, जासुंद पाटील, सुनिल ताम्हणकर, रमेश बुरबुरे, बबन खंडाते, रुपेश पालांदूरकर, आशीष सोमकुवर, प्रदिप नारनवरे, निशांत ताकसांडे, अश्विन सावरकर, सतिश धमगाये अमोल रहाटे, निशा चौधरी, संजय पाटील, कैलाश गणवीर, अनील वासनिक इत्यादी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
प्रतिक्रिया :- अग्निशमन विभागात कंत्राटदाराने पुरविलेले हे कंत्राटी कामगार आहेत.कुणाला ठेवावे अथवा काढावे ही कंत्राटदाराची जबाबदारी आहे.त्यांचा व न.प.चा काहीही संबंध नाही. तसेही यावर्षी शासनाचे नियमित कर्मचारी रुजू होणार आहेत.
डॉ.विजय देशमुख (मुख्याधिकारी न.प.वाडी)