जागतिक महिला दिनीच दवलामेटीच्या महिला सरपंचावर अविश्वास प्रस्ताव पारित!
# काँग्रेस च्या मदतीने भाजप ची खेळी ठरली यशस्वी!
# सरपंच रीता उमरेडकर व उपसरपंच प्रशांत केवटे यांचावर ९ विरुद्ध ३ ने प्रस्ताव पारित
# एका अपात्र सदस्यांला सोमवारी मिळालेला स्थगिती आदेश बुधवारी सकाळी रद्द
# जागतिक महिला दिनी झालेली अविश्वास कार्यवाही हा महिलांचा अपमान – रीता उमरेडकर
वाडी (प्र): येथील दवलामेटी ग्रा.पं. च्या सरपंच रीता उमरेडकर व उपसरपंच प्रशांत केवटे यांच्यावर ८ मार्च महिला दिनीच ग्रामपंचायत दवलामेटी च्या सभागृहात नागपूर ग्रामीणचे तहसीलदार आकाश वानखेडे यांच्या उपस्थितीत ९ विरूद्ध ३ मतांनी अविश्वास प्रस्ताव पारित झाला.भाजप च्या यशस्वी खेळीने नागरिकांत मात्र संताप दिसून आला.काँग्रेस समर्थित सदस्य अर्चना चौधरी व वंचित बहुजन आघाडी समर्थित साधना शेंद्रे यांनी विरोधी पक्षाच्या बाजूने मतदान केल्याने नागरिकांनी सभागृह बाहेर त्यांच्या व स्थानिक आमदाराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.मुख्य म्हणजे एक अपात्र सदस्य सिद्धार्थ ढोके यांनी आयुक्त कार्यालयाकडून सोमवारी स्थगिती आदेश आणला परंतु तो आदेश बुधवारी रद्द झाल्याचे कळवण्यात आल्याने त्याला सभागृहातच येऊ दिले नाही.मात्र आदेश रद्द का झाला याचे कारण अद्याप कडू शकले नाही.यामुळे नागरिकात तीव्र असंतोष दिसून आला तर प्रशासन दबावतंत्रात काम करीत असल्याची चर्चाही सभागृहाबाहेर नागरिकात होती.अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने भाजपाचे गजानन रामेकर,सतीश खोब्रागडे,छाया खिल्लारे,रश्मी पाटिल,शकुंतला अभ्यंकर,उज्वला गजभिये, शितल वानखेडे,काॅग्रेसच्या अर्चना चौधरी वंचित च्या साधना शेंद्रे असे एकुण ९ सदस्यांनी मतदान केले.तर प्रस्तावाच्या विरोधात सरपंच रीता उमरेडकर,उपसरपंच प्रशांत केवटे सदस्य रक्षा सुखदेवे एकुण ३ सदस्यांनी मतदान केले.जागतिक महिला दिनी एका महिला सरपंचावर अशा प्रकारचा अविश्वास प्रस्ताव आणणे हे महिलांच्या सन्मानार्थ कितपत योग्य आहे यामुळे परिसरातील नागरिकात चांगलाच संताप दिसून आला.लक्षात असावे की मागील २ वर्षा आधी दवलामेटी ग्रा.पं. च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या निर्वाचित उमेदवार रिता उमरेडकर यांची सरपंच पदी तर काँग्रेसचे प्रशांत केवटे यांची उपसरपंच पदी वर्णी लागली होती. कालांतराने येथे विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षाच्या ४ सदस्यांवर अतिक्रमणात घर बांधल्याचा ठपका ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कारवाई करून त्यांना अपात्र घोषित केले होते.तद्नंतर एका सत्ताधारी सदस्याला तीन अपत्य असल्याचे कारण पुढे ठेवून विरोधी पक्षाने दबाव तंत्राचा वापर करीत त्याला आपल्याकडे ओढून घेतले या घटनेमुळे गावातील नागरिक विरोधी पक्षाच्या या कृतीवर चांगलेच संतापले आहेत.जागतिक महिला दिनी झालेली अविश्वास कार्यवाही महिलांचा अपमान करणारी असल्याचे मत सरपंच रीता उमरेडकर यांनी व्यक्त केले.
यावेळी ग्रामपंचायत परिसरात शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती.अनुचित घटना घडू नये यासाठी वाडी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.