मृत कर्मचारी सुभाष गजभिये च्या कुटुंबाला कंत्राटदाराने सोडले वाऱ्यावर!

1097

मृत कर्मचारी सुभाष गजभिये च्या कुटुंबाला कंत्राटदाराने सोडले वाऱ्यावर!

# संतप्त कुटुंब व नागरिक पोहचले पोलीस ठाण्यात

वाडी (प्र): डॉ.आंबेडकर नगर निवासी सामाजिक कार्यकर्ते सुभाष शंकरराव गजभिये हे नागपूर-अमरावती महामार्गावर उड्डाण पुल निर्मितीचे काम करणारी टी.एन.टी.इन्फ्रा कंपनीत ओरीयंटल असोसिएट च्या वतीने सुरक्षा रक्षकाच्या कर्तव्यावर तैनात असतांना दि.16 मार्चला रात्री 11 वा.चे दरम्यान मुख्य प्रवेशद्वाराचे लोखंडी बॅरियर खाली ओढतांना त्यांचे डोक्यावर पडल्यामुळे मान व मेंदूला गंभीर दुखापत झाली होती. यामुळे त्यांना सदर स्थित विम्स रुग्णालयात आयसीयू मध्ये भरती करण्यात आले होते. तदनंतर त्यांच्यावर किरकोळ शस्त्रक्रियाही करण्यात आली होती.परंतु

उपचाराला प्रतिसाद न देता दि. 25 मार्चला त्यांचे निधन झाले.कंत्राटदाराने या दरम्यान उपचार खर्च व उचित आर्थिक मदत देण्याचे मान्य केले होते.मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याने घरचे कमावते व कुटुंबाचा आधार गेल्याने त्यांचे कुटुंब चांगलेच आर्थिक अडचणीत सापडले.

तदनंतर कुटुंबियांनी वारंवार टीएनटी व ओरिएंटल असोसिएट कंपनीचे संचालक यांच्याशी संपर्क साधून आर्थिक नुकसान भरपाईची मागणी केली.परंतु आतापर्यंत उडवा उडवी ची उत्तरे मिळाल्याने व भेटायला वेळ न दिल्याने कुटुंबासह नागरिकात तीव्र रोष निर्माण झाला होता.

त्या मुळे शुक्रवारी 31 मार्च रोजी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव बंटी शेळके,माजी जि.प.सदस्य दिनेश बन्सोड,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अश्विन बैस,राष्ट्रवादी सामाजिक न्याय आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे,भिमसेनेचे जिल्हाध्यक्ष रोशन सोमकुवर,शौर्य सेनेचे भूषण सोमकुवर यांचे सह मोठ्या संख्येने नागरीक एकत्रित येऊन अमरावती महामार्गावरील जुन्या नाक्यापासून ते काटोल बायपास वळणापर्यंत तीव्र आक्रोश मोर्चा काढला व जोपर्यंत कंपनी संचालक येऊन भेट देत नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही अशी भूमिका घेतली.यावेळी कंपनीच्या विरोधात जोरदार नारेबाजीही केली. या अचानक झालेल्या आक्रोश मोर्चाची वाडी पोलीसांना माहिती होताच त्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली.

वाडी पोलीस ठाण्याचे पो.नि.प्रदीप रायान्नावार यांनी मोर्चेकरांची समजूत घातली व पोलीस स्टेशनला जाऊन कंपनी संचालकांशी चर्चा करू असे सांगितले.तदनंतर या मोर्चेकऱ्यांनी वाडी पोलीस ठाणे गाठले.कम्पनी च्या वागणुकी विरोधात तीव्र आक्षेप नोंदवून पो.नि.प्रदीप रायान्नावार यांना योग्य कार्यवाहीची मागणी केली.त्यांनी स्थिती लक्षात घेऊन संतप्त नागरिकांची समजूत घातली.वाडी पोलिसांनी कंपनी संचालकाशी संपर्क साधला असता ते नागपूर येथे उपलब्ध नसल्याचे कळले त्या मुळे पो.नि.प्रदीप रायन्नावार यांनी कुटुंबीयांना रीतसर तक्रार निवेदन देण्याचे सुचवले व नियमानुसार कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले.

या आंदोलनात समीर मेंढे,राजेश जंगले,नितेश गजभिये,सुरज वानखेडे, नितेश जंगले,आशिष झा,गौतम तिरपुडे,आशिष नंदागवळी,दिलीप भोरगडे,मनोज भागवतकर,चंदू सोनपिंपळे,आशा गजभिये,मंगला गजभिये,सुनिता बागडे,कमल सहारे,विमल तिडके,सिंधुबाई धारकर,निरंजन डोंगरे,गीता उके,पुष्पा सोनटक्के इं. शेकडो महिला पुरुषांनी सहभाग घेतला. योग्य कार्यवाही न केल्यास पुढील लोकशाही मार्गाने होणाऱ्या आंदोलन व परिणामाला कंत्राटदार व कंपनी जबाबदार राहील असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला.