पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय न.प.ने वाडीतील अतिक्रमण हटविले कसे ? शिवसेनेचा सवाल!

534

पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय न.प.ने वाडीतील अतिक्रमण हटविले कसे ? शिवसेनेचा सवाल !

# लवकरच 2 एकर जागेवर व्यवस्था करणार – मुख्याधिकारी

वाडी (प्र): वाडी नगरपरिषदेची स्थापना होऊन जवळपास ८ वर्षाचा कालावधी लोटला.परंतु अद्याप येथील फुटपात दुकानदारांसाठी न.प.ने व्यापार संकुल ची निर्मिती केली नाही. त्यामुळे उदरनिर्वासाठी हे व्यवसायिक मिळेल त्या ठिकाणी व्यवसाय करीत आहेत.परंतु नुकतेच कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता काही विशिष्ट मार्गावरच न.प.‌मुख्याधिकारी डॉ.विजय देशमुख यांनी अतिक्रमणाची कारवाई(encroachment action) केल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

लक्षात असावे की सध्या नागपूर अमरावती-
महामार्गावर पुल निर्मितीचे कार्य सुरू आहे व या अतिक्रमण धारी व्यावसायिकांमुळे रोजच मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा खोळंबा होत आहे.ही वाहतूक सुरळीत करण्याच्या हेतूने नुकतेच नगरपरिषदेने अतिक्रमणाची कारवाई करून रस्ता मोकळा केला हे खरे जरी असले तरी पर्यायी व्यवस्था करण्याची जबाबदारी न.प.टाळत आहे हे स्पष्ट दिसते.या अतिक्रमण कारवाईमुळे या छोट्या व्यावसायिकां समोर उपासमारीची वेळ आली असून उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न उभा झाला आहे. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन सोमवारी वाडी शहर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी डॉ.विजय देशमुख यांची भेट घेऊन एक निवेदन सादर करून विविध प्रश्न विचारून मुख्याधिकाऱ्यांचे या समस्येकडे लक्ष वेधले.

निवेदनानुसार अतिक्रमणात बसलेले छोटे व्यवसायिक हे नगरपरिषदेचे नोंदणीकृत व्यवसायिक आहेत.नगरपरिषदेने त्यांना व्यवसायासाठी लोन उपलब्ध करून दिले.परंतू व्यवसाय करण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली नाही. मग आता त्यांनी कर्जाचे हप्ते कसे भरावे.?? आधी पर्यायी व्यवस्था करा व नंतरच यांच्यावर अतिक्रमणाची कारवाई करा अशा आशयाचे निवेदन मुख्याधिकारी डॉ.विजय देशमुख यांना दिले. शिष्टमंडळात युवासेनेचे राष्ट्रीय सदस्य हर्षल काकडे, शिवसेनेचे हिंगणा विधानसभा समन्वयक संतोष केचे,तालुकाप्रमुख संजय अनासाने उपतालुका प्रमुख रुपेश झाडे सह रमेश भेंडारकर,अजय देशमुख,बंडु चौधरी इत्यादी उपस्थित होते.

यावेळी शिष्टमंडळाला मुख्याधिकारी डॉ.विजय देशमुख यांनी सांगितले की,अग्रवाल कॉम्पलेक्स
च्या मागे नगर परिषद ची दोन एकर जमीन आहे.त्या जागेवर नोंदणी केलेल्या सर्व अतिक्रमण धारकांना जागा उपलब्ध करुन देण्याची त्यांनी ग्वाही दिली.
यासह अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही नियमित होणार असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.त्या मुळे सर्व चिंताग्रस्त दुकानदाराचे लक्ष आता मुख्याधिकारी यांच्या कार्यवाहिकडे लागले आहे.