जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे जागतिक सामाजिक न्याय दिवस साजरा

76

                             नेत्र शिबिरात 18 मोतिबिंदू शस्त्रक्रिया

नागपूर,दि. 22 : कन्हान येथील मांग गारूडी मोहल्ला परिसरात जागतिक सामाजिक न्याय दिवसानिमित्त “झोपडपट्टी सक्षमीकरणाअंतर्गत नागरिकांना कौशल्य विकास योजनांची माहिती व नेत्र तपासणी कार्यक्रमाविषयी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष न्या. एस.बी. अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली  करण्यात आले.

कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर जयदीप पांडे हे होते तर आयसीआयसीआय अकॅडमीच्या श्रीमती  ज्योती, सतीश धुर्वे, व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे विधी स्वयंसेवक आनंद मांजरखेडे व मुकुंद आडेवार उपस्थित होते,

जागतिक सामाजिक न्याय दिवसानिमित्य आयोजित कार्यक्रमात  न्या.जयदिप गो. पांडे यांनी संबोधित केले. लोकांमध्ये विविध प्रकारचे भेदभाव निर्माण झाल्यास लोकांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. जगभरात लोकांमध्ये निर्माण होणारा भेदभाव समूळ नष्ट करण्याकरीता दरवर्षी जागतिक सामाजिक न्याय दिवस साजरा करण्यात येतो. संविधानाने आपल्याला समानतेचा संदेश दिला आहे. कायद्यासमोर सर्व समान आहेत. सामाजिक न्याय विभागांतर्गत नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या छात्रावास, शिष्यवृत्ती व शैक्षणिक सुविधा योजनांची माहिती त्यांनी  यावेळी दिली.

 आनंद मांजरखेडे, श्रीमती ज्योती यांचीही मार्गदर्शनपर भाषणे यावेळी झाली. याप्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व समता फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील नागरिकांसाठी नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. तपासणीअंती 18 नागरिकांना मोतीबिंदु असल्याचे आढळून आले. समता फाऊंडेशन तर्फे त्यांची मोतीबिंदु शस्त्रक्रिया करण्यात आली.

कार्यक्रमाचे संचालन आंनद मांजरखेडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार अर्जुन पात्रे यांनी मानले.